
आश्रय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक संस्था

जगातील प्रत्येक व्यक्ती समाजाशी बांधील असते . व्यक्तीचा उदय आणि विकास समाजामध्येच होत असतो."जी व्यक्ती समाजाशिवाय राहते ती एकतर पशु असते किंवा देव असू शकते". ग्रीक तत्वज्ञ अरीस्टाटलने इसवी सन पूर्व ३२० मध्ये लिहिलेले हे वाक्य आजच्या काळात हि तंतोतंत लागू ठरते. मग समाजाशी बांधील असणे म्हणजे नेमके तरी काय ? रात्रंदिवस समाजासाठी कार्य करीत राहायचं? घरदार सोडून समाजकार्य करीत फिरायचं? म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणता येयील ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण सामाजिक बांधिलकीची व्याख्या थोडक्या शब्दात सांगावीशी वाटते ती हि कि, कुटुंबात राहून ज्याप्रमाणे समाधान प्राप्तीसाठी परमेश्वराची आपण भक्ती करतो, आराधना करतो. नित्यनेमाने दर दिवशी देवपूजा करतो. व एक प्रकारे मानसिक समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे समाजाचे आपल्यावर असलेले प्रचंड ॠण लक्षात घेऊन नित्यनेमाने दर दिवशी आपल्याला जमेल त्या स्वरुपात सामाजिक कार्य करणे हे होय.
आज समाजाची अवस्था खूप गंभीर झाल्याचे चित्र दिसत आहे. शिक्षण , आरोग्य , भूक , बेरोजगारी , लोकसंख्या , रस्ते, वीज , पाणी आदी अनेक समस्या उग्र रूप धारण करू लागल्या आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाने खूप प्रगती केल्याचा गवगवात होत आहे. पण मानवाच्या मुलभूत गरजा , समस्या सोडवण्याची पूर्ण जबाबदारी विज्ञान तंत्रज्ञान पार पाडू शकलेले नाही. पाण्यासाठी मानवाचा संघर्ष सुरूच आहे. जगातल्या ज्या ज्या गोष्टी मुलभूत आणि मौल्यवान आहेत या सर्व गोष्टींसाठी मानवाचा संघर्ष सुरु आहे. विज्ञान तंत्रज्ञानाने जग जवळ आल्याचे बोलले जात असले तरी हि माणूस माणसापासून कित्येक योजने दूर गेला हि वस्तुस्थिती आहे.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे असं समाजशास्त्र सांगत. समाजाचे माणसावरती प्रचंड ऋण आहेत. त्यामुळे माणसामध्ये असलेली परोपकाराची वृत्ती लक्षात घेता माणसाने देखील समाजासाठी काहीतरी करने अपेक्षित आहे. हेच सूत्र पकडून सामाजिक जाणीवेच्या भावनेपोटी आम्ही 'आश्रय ' या नावाने सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. आणि भविष्यातही अनेक उपक्रम राबविण्याची इच्छा आहे.
आश्रय सामाजिक संस्कृतिक शैक्षणिक ट्रस्ट व्दारे आजपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. गोर-गरिबांना आर्थिक मदत करणे , खेडोपाड्यात दिवाबत्तीची सोय उपलब्ध करून देणे , विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव निर्माण करून देणे आणि चांगल्या व हुशार विद्यार्थ्यांचा गौरव करणे असे विविध कार्यक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात आले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप , गणवेशवाटप , आश्रमातील विद्यार्थ्यांना फळवाटप , तरुणांसाठी शरीरसौष्ठव स्पर्धा अश्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला संस्थेने सुरुवात केली आहे.
संस्थेचे विविध उपक्रम

सामाजिक कार्य
१. मोतीबिंदू झालेल्या रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया केली जाते. आजपर्यंत विविध ठिकाणी कॅम्प लावून ४७२ लोकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
२. गरीब रुग्णांसाठी दरमहा मोफत हेल्थ चेकअप कॅम्प लावण्यात येतो.
३. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे हि मोठी समाजाची जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून दरवर्षी दहा गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलण्यात येतो.
४. शहर दिव्यांनी उजळून निघत असताना , ग्रामीण भागामध्ये अजूनही बारा बारा तास लोडशेडिंग होत आहे . हि खूप दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल . यापेक्षा खेदाची गोष्ट म्हणजे मुंबई शहराच्या जवळ असलेल्या भाईंदर तालुक्यात अजूनही काही गावांमध्ये विजेची सोय नाही . "बाभळीचा भात " या गावामध्ये अजूनही वीज नाही . गावामध्ये सोलर लॅम्प लावण्याची सोय आमच्या संस्थेने केली आहे.
५. आजपर्यंत आमच्या संस्थेने पाचशेहून अधिक सोलर लॅम्प खेडोपाड्यात लावले आहेत.
६. आपल्या सर्वाना सांगायला अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या संस्थेच्या चाळीसहून अधिक शाखा मुंबई - ठाणे सह महत्वाच्या शहरांमध्ये कार्यरत असून संस्थेच्या वतीने जेष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप , रक्तगट तपासणी शिबीर , मतदार यादीत नाव समाविष्ट करणे असे अनेक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले आहेत.
७. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अविकसित भाग असलेल्या वाडा - जव्हार आदि भागांमध्ये बोरिंग पाडून पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत नऊ ठिकाणी बोरिंग पाडण्यात आल्या आहेत.
सांस्कृतिक
प्रत्येक व्यक्ती कोणता न कोणता तरी कलागुण जोपासत असतो . विद्यार्थ्यांमध्ये तर कलेची विशेष आवड असते. हाच धागा पकडत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेने सांस्कृतिक दृष्टीकोनातून विविध उपक्रम सुरु केले आहेत.
१. विविध शाळांमधील कलेची आवड असणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना निवडून गायन - वादनाचे क्लास लावण्यात आले आहेत.
२. समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समाजगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्याचा उपक्रम आमच्या संस्थेने सुरु केला आहे.जेणे करून अश्या कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तुत्वाला उभारी मिळेल व समाजातील व्यक्ती सुद्धा त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून कामाला लागतील हा व्यापक हेतू समोर ठेवण्यात आला आहे.
शैक्षणिक कार्य
समाज सुसंस्कृत आणि बलशाली बनविण्यासाठी शिक्षण हा महत्वाचा घटक मानला जातो. सामाजिक भान ठेवत असताना आणि कलेची आवड निर्माण करीत असताना शैक्षणिक उपक्रम राबविणे हे संस्थेचे सर्वात मोठे धैर्य आहे. त्यादृष्टीने संस्थेने विविध शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत.
१. जुन महिन्याच्या सुरुवातीला शाळा सुरु होताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम होतो.
२. ग्रामीण भागातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना भेट देऊन फळ वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात येतो.
३. नजीकच्या काळात संस्थेच्या शाळा उभारण्याचा मानस असून विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न राहिल.